Friday, June 10, 2011

एक गोष्ट


                  घन घन शाळेची घंटा झाली, डब्बा न आणल्याने काय करावे हा विचार करत करत शाळेच्या वाचणालयासमोर पोहोचलेही. टेबलावर पुस्तकांचा ढिग आणि मुलांची पुस्तके पाहण्याची गर्दी पाहुन पाऊले पटकन त्या दिशेने वळले. पुस्तकाच्या पृष्ट्पानावरच सुरेख देखावा त्यातील हिरवीगार झाडे, निखळ वाहनारा झरा त्यातील पांढरेशुभ्र पाणी, हिरव्या हिरव्या गालिच्यावर पांढरी पिवळी धमक फुले पाहुनच  मन भारुन गेले, चट्कन ते पुस्तक हातात घेतले आणि पहिले पान उलटले.
                         
ययाती कदंबरी लिहुन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकर यांचे हे पुस्तक. या पुस्तकतील कथेचे नाव ’दोन ढग’.

एका खळखळ वाहणाऱ्या निर्झराच्या नितळ पाण्यात आपले पांढरे शुभ्र मोत्यासारखे सुंदर रुप पाहुन पांढरा ढग खुश झाला. आपल्या रुपाचा त्याला गर्व वाटू लागला. तोच शेजारी त्याला काळा ढग दिसला. त्याच्या काळ्याकुट्ट रंगाकडे पाहुन पांढऱ्या ढगाला त्याचा तिरस्कार वाटू लागला. तो काळ्या ढगाला उद्देशून म्हणाला, " काय तुझे हे काळेकुट्ट रुप. तुझ्यात थोडेही सौंदर्य नाही ".
त्यावर काळा ढग म्हणाला, " आपण दोघे बंधू आहोत, आपला पिता एकच आहे तो म्हणजे महासागर". तेव्हा तू सूंदर आहेस याचा मला अभिमान आहे. पण मी ही फारसा कुरुप नाही".
यावर पांढरा ढग खळवळून म्हणाला, " अरे तू काळाकुट्ट, मला तुझ्या शेजारी बसणेही पसंत नाही. देवालाही तुझे रुप आवडणार नाही. देवाला मीच प्रिय आहे".
अशा प्रकारे पांढरा ढग गर्वाने फुगत चालला होता. तोच सोसाट्याचा वारा सुटला. पांढर ढग कोठल्या कोठे भरकटत गेला. काळा ढग उंच उंच वाढत गेला. जलकणांनी तो संपूर्ण भरला. विजेच्या जलतारी रेषांनी तो सुशोभित झाला. टपोऱ्या थेंबांनी तो बरसू लागला. धरतीमाता मृदगंधाने दरवळून गेली. नदी-नाले पाण्याने दुथडी भरुन वाहू लागले. शेतकरी आनंदी झाला. काळ्या ढगाच्या जिवाचे सोने झाले. त्यावेळी पांढरे ढग कोठे नाहीसे झाले याचा पत्ता ही लागला नाही.
                       
स्वर्गात देवांची  चर्चा सुरु झाली. स्वर्गात जागा कोणाला द्यायची? रुपसुंदर पांढऱ्या ढगाला की सर्वस्व अर्पण करणाऱ्या काळ्या ढगाला? देवांनी एकमताने निर्णय घेतला; स्वर्गात काळ्या ढगाला स्थान द्यावे.
जे जटा वाढवतात, भस्म फासतात, माळा जपतात अशा वरकरणी नटणाऱ्या भक्तांना स्वर्गात जागा नसते. तर जो रंजल्या गांजलेल्यांच्या मदतीला धावुन जातो, जगाच्या कल्यानासठी स्वःताचे सर्वस्व अर्पण कारतो; त्यांनाच स्वर्गात जागा मिळते. काळा ढग हा स्वार्थत्यागाचे प्रतिक आहे तर पांढरा ढर हा संकुचित प्रवृत्तीचे प्रतिक आहे.

म्हणतात ना,
जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती ।
 देह कष्टविती परोपकारे ॥